Copy Pate Block

Sunday 27 November 2016

वाट

वाट धावते धावते
चढ उतार घेऊन;
दु:ख गिळते हासत
आत हुंदका पिऊन !

दूर आभाळ सांगते
अंत जगण्यास नाही;
आज लहान रोपटं
उदया उंच झाड होई !

कसे नियतीचे हे असे
उन्हंसावलीचे खेळ;
चंद्र उगवतो तीच
सूर्य अस्ताचीही वेळ !

कुणी मागतात काय
काय कुणास मिळते;
मन फुलाचेही असे
कधी काट्यात जळते !

येथे उलटी वाहते
रे न्यायाचीही गंगा;
झाले इमान पोरके
नीती माजाविते दंगा !

नाही कुणाची कुणाला
इथे राहिलेली चाड;
पुण्य करपून जाई
वाढे पापाचेच झाड !

वाट धावते धावते
चढ उतार घेवून;
काय सांगावे सोडेल
कुठे जगणे नेऊन !

-फ. मुं. शिंदे

No comments:

Post a Comment