Copy Pate Block

Monday 1 June 2020

पाखऱ्या (इयत्ता ७वी - २००७)

 

रंगराव बापू पाटील (जन्म १९३९): ग्रामीण कथा कादंबरी लेखक. ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 'ल्हावर', 'रानकोंबडी', ‘मुराळी', ‘भोवरा' इत्यादी कथासंग्रह; 'बोरबन', 'दंश', 'वस्ताद' या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित.

आपल्या कृषिप्रधान देशात बैलाला विशेष महत्त्व आहे. 'पाखऱ्या ' या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्यांबद्दलची प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे.

_______________________________________________________________________________

                आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती. वशिंड ऐटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एकाच डिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जाई.

आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळवून आणत, मग त्याला भरडा चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार

आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे. ते त्याला जिवापाड जपत.

पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती.

'आबांचा पाखऱ्या' या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा-वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते येई.

एकदा गुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱर्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर-कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला. कऱ्हाडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती. झुंज सुरू

झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या. खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागली. धुरळा उडाला. झुंज चांगली तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखर्याने एक जोराची धडक दिली आणि गुढे गावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखर्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली. त्याच वेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कुणी फेटे उडवले. कुणी गुलाल उडवला.

आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंत:करण आनंदाने फुलून आले.

मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी-लेझीम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले

आतां पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांची अशी लढत लावणे ती पाहत बसणे हे अमानुष आहे, असे सरकारने म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत गाडीलाही जुंपत नसत. नांगराला तर त्याला कधीच जुंपलला नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता

एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडीही तिथेच बसले होते. आबा येताच त्यांचे बोलणे थांबले. आबांनी विचारले,

‘’कायरं? असं का गप झालाय? काय बेत हाय?"

"काय न्हाय,'' एक गडी हळूच बोलला.

‘’काय जयसिंगराव, काय चाललंय?"'

जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले, “पाखऱ्याला इकायचं म्हणतुया."

"डोकं फिरलं काय तुझं '’ आबा संतापून म्हणाले.

सर्वजण गप्प झाले; पण तोच आबांनी पुन्हा विचारले,

का? कशासाठी विकायचा?”

त्यो झुंज खेळणारा बैल हाय. रानातल्या कामाला उपयोगी पडत न्हाय. आता त्यो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतुया. इकून पैकाबी चांगला यील..." जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले.

तुमाला काय करायचं ते करा जावा. तुमी कारभारी हाय आता,'' असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले.

त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोष होऊन नाचणारी, रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते.

जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुऊन आणला. शिंगे घोळून टोकदार केली. गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला. एका पायात काळा गोफ बांधला. अंगावर सुंदर नक्षीची झूलही घातली.

सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते. मगगड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीणबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला.

'“हंजा बाबा, तुझा इथला घास संपला आता,'' आबा आवंढा गिळत बोलले.

काय आबा? कुणाचा घास संपला आता?'” असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही, तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाहीत.

'“काय गडबड आहे जयसिंगराव?" तात्यांनी विचारले.

''विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला."

विकायला?”

होय तात्या.''

कारं बाबा?'

"आता तो म्हातारा झालाय. शेतीची कामही त्याला जमत न्हाईत."

म्हणून विकता?” तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले.

होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला स्वरानाही लई लागतुया. तोही खर्च इनाकारणी.

यावर तात्या गप्प झाले सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कृणीच काही बोलले नाही.

मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले, “जयसिंगराव,जरा इकडंया.''

जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला.

बसा, खाली बसा.''

काय तात्या?"

असं खाली बसा. मग सांगतो."

जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पायऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीणबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या.

जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती?"

का बरं?'"

किंमत बोला अगोदर,'' तात्या गंभीरपणे म्हणाले.

पाच हजार रुपये...”

  “पाखऱ्याला मी घेतोय...”

तुमी?”

होय. आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा. ते आमच्याकडेच राहतील.”

 का बरं?”

ते पण आता म्हातारे झालेत. त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो. तो विनाकारण खर्च."

हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले, आरं, पाखऱ्याला दावणीला बांधा. तो आपल्या दावणीला कायम ऱ्हाईल.


जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले. आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.


 



 


 



Sunday 31 May 2020

दिवस ऊन-पावसाचे (इयत्ता ७वी - २००७)

 

अरुण खोरे (अरूण बबनराव खोरे: जन्म १९५४) प्रथितयश पत्रकार, लेखक. उत्कृष्ट पत्रकारितेचा 'दर्पण पुरस्कार' प्राप्त. 'इंदिरा प्रियदर्शिनी', 'दोन युरोप' ही पोरके दिवस' हे आत्मनिवेदनात्मक पुस्तक प्रसिद्ध.

आईचे छत्र हरवल्यानंतर अनाथाश्रमात वाढलेल्या मुलाने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'पोस्टमन' ची नोकरी स्वीकारली. त्या वेळचे प्रत्ययकारी अनुभव या पाठात कथन केले आहेत.

_____________________________________________________________________________________________

त्या वेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. सकाळी कॉलेजात जात होतो. शिक्षण चालू ठेवण्यासाठी मला दुपारची दिवसभरची नोकरी हवी होती; पण ती काही मिळत नव्हती. मिळालीच एखादी नोकरी तर काय काय करायचे याची स्वप्ने मात्र मी त्या वेळी रंगवत असे. माझे एक स्वप्न असे होते-महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमांतून, स्पर्धांतून मी भाग घेत असे. चांगले नाव मिळत होते. स्नेहसंमेलनात, विविध कार्यक्रमांत भाग घेत होतो. त्या वेळी काही मुले मस्तपैकी ब्लेझरचे कोट अंगावर चढवून मिरवायची. असा एखादा सुंदर कोट अंगावर चढवून मिरवायचे अशी फार फार इच्छा होती.

शेवटी एक 'कोट मिळाला ! तो रोजच मिळू लागला ! हा कोट होता पोस्टमनचा. खाकी डगला !

एफ.वाय.बी.ए.त असताना वृत्तपत्रातून एक जाहिरात झळकली, 'पोस्टमन भरणे आहेत'.

खरे तर या जाहिरातीने हरखून जावे असे काही नव्हते; पण म्हटले, कॉलेजची दोन वर्षे बेकारीत गेली. आता या नोकरीसाठी प्रयत्न करून पाहू. जमले तर जमले.

अर्ज केला. त्यानंतर लेखी परीक्षा दिली. तीन महिन्यांनी माझी निवड झाल्याचे पत्र आले.मला आनंद झाला आणि त्या पाठोपाठ पोटात गोळा आला. बापरे! मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो, त्या भोवतालच्या इमारती मला भयंकर दिसू लागल्या. शेकडो इमारतींचे चार-चार मजले चढून जायचे आणि तेही पत्रे वाटत. ही कल्पनाच मला भयंकर वाटू लागली आणि दुसरे म्हणजे आपल्याला लगेच रुजू व्हावे लागले तर कॉलेज संपलेच! या विचाराने मी बेचैन झालो. मी ही नोकरी न स्वीकारण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण व्यर्थ!

शेवटी रुजू झालो. खाकी कपडे चढवलेले अनेक पोस्टमन पोस्टातल्या एका हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी समोरच्या पत्रांच्या गठ्ठ्यांचे सॉर्टिंग करतं बसलेले. मी खिन्न मनाने एका पोस्टमनशेजारी जाऊन सॉर्टिंग पाहत उभा राहिलो. पोस्टमन मित्रांचे हात यंत्रवत चालत होते. सुमारे दोन तासांनी सॉर्टिंग संपले. पत्रांचे गठ्ठे घेऊन सगळे दुत बाहेर निघाले. मी ज्या पोस्टमनसह जाणार होतो, तोही उठला आणि आमची भ्रमंती सुरू झाली.

अडीच एक तास पत्रवाटपाचे काम चालले होते. सुदैवाची गोष्ट एवढीच होती, की या पोस्टमनला जो बटवड्याचा भाग होता, त्यात उंच इमारती फारशा नव्हत्या. मला कामाच्या दृष्टीने बरे वाटले.

कॉलेज साडेसातचं आणि पोस्टात जावं लागे साडेसहालाच ! दुसर्‍या दिवशी त्या पोस्टमनला मी सांगितले, की मी कॉलेजात जाणारा विंद्यार्थी आहे, तर मला लवकर सोडत जा. तोही भला माणूस होता. आम्ही बटवड्याला बाहेर निघालो, की मला तो पंधरा-वीस मिनिटांनी सोडत असे. मी अदम्य उत्साहाने कॉलेजला पळत सुटे. अशा वेळी कॉलजचे दिवस काही वेगळेच वाटू लागत. मन मोहरून जायचे. मनाला तजेला मिळायचा. हे जग आपल्यापासून अलग होऊ नये, आपण इथून दूर जाऊ नये असे वाटत राहायचे.

प्रशिक्षणाचे दहा दिवस संपले. लवकरच परीक्षा सुरू झाल्या. कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झाले. पोस्टमनच्या नोकरीची ऑर्डर या वर्षात येऊच नये, असे वाटत होते; पण बी.ए.ची परीक्षा होण्यापूर्वी मला पोस्टमन म्हणून पोस्टात रुजू होण्याचा आदेश मिळाला. मी गडबडून गेलो.

दोन चित्रे स्पष्ट दिसू लागली. एक तर हाता-तोंडाशी आलेली पदवी परीक्षा अर्ध्यावर सोडावी लागणार आणि जर ही नोकरी सोडली तर बी.ए. नंतर पुन्हा नोकरीच्या शोधात उन्हात फिरावे लागणार ! पर्याय एकच होता पोस्टमनची नोकरी स्वीकारणे हाच! आणि तो मी बिनतक्रार स्वीकारला.

थंडीचे दिवस होते! गारवा बराच होता. मी सहा वाजताच पोस्टात पोचलो अजून बरेच पोस्टमन यायचे होते. मी पोस्टमास्तरांना भेटलो. एक-दोन ओळखीचे पोस्टमन होते. त्यांनाही भेटलो. मला शिकवणाऱ्या पोस्टमनने सॉर्टिंग पद्धतीने करायचे, हे सांगितले. मला सहा नंबरची बीट दिली होती. मला ट्रेनिंग आणि बीटची माहिती देण्यासाठी एक पोस्टमन माझ्याबरोबर आला.

सुरुवात टपाल ठेवण्याच्या बॅगेपासुन असते. तीन-चार कप्पे असणारी जाड, खाकी कापडाची बॅग, पत्रे, पाकिटे, आकाराने लहान-मोठी चौकोनी मासिके, अहवाल यांचे टपाल अशी साधारण विभागणी करून ते ठेवावे लागते. तसेच आपण कुठल्या मागनि पत्रे वाटणार तो मार्ग निश्‍चित करून त्याप्रमाणे हे टपाल सॉर्ट करून एकत्र बांधून घ्यावे लागते. टपाल बॅगेत ठेवल्यावर ती सुतळीने सायकलच्या हँडलला व्यवस्थित अशी बांधावी लागते, की त्यातून पत्रे पडणार नाहीत आणि ती सहजी काढूनही घेता आली पाहिजेत.

माझे पहिले तीन दिवस बरे गेले; पण त्या प्रचंड बीटची धास्ती माझ्या मनाने घेतली. चौथ्या दिवसापासून स्वतंत्रपणे बटवडा करायचा होता. माझ्या दृष्टीने तो चौथा दिवस ऐतिहासिक ठरला. पोस्टातून बाहेर पडायलाच मला जवळ जवळ साडेनऊ वाजून गेले होते.


पत्रे टाकत मी पुढे जात होतो. चुकून राहिलेली परत आणून टाकत होतो. कुत्र्यांना भीत भीत त्यांच्या मालकांना जोरात हाक मारून देत होतो. वेळ वाढत चालला होता. बारा-एकच्या सुमारास एका साध्या हॅटिलात थोडा नाश्ता केला. माझ्या एक लक्षात आले, की आजच्या दिवसात ही बॅग काही रिकामी होणार नाही. दिवेलागण झाली तरी माझे काम चाल होते. साडेसात वाजता उरलेली पत्रे बॅगेत ठेवून मी पोस्टाकडे निघालो. त्या दिवशी सुमारे दोनशे पत्रे उरली होती. पोस्टमास्तरांनी माझ्याकडून खुलासा जबाब लिहून घेतला. बहुधा आता आपली नोकरी सुटणार असे मला वाटू लागले; पण नोकरी राहावी, यापुढे आपण ती चांगली करू असे मन म्हणत होते.

दुसऱ्या दिवशी मला कालच्यापेक्षा अधिक उशीर झाला. पोस्टमास्तरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माझा रिपोर्ट दिला. ते माझ्यावर भलतेच उखडले. पत्रांचे वेळेत वाटप करण्याच्या सृचना दिल्या. त्यानंतर मात्र माझे काम साधारण वेळेत संपू लागले; पण पंधरा दिवसांतच माझी बदली दुसऱ्या पोस्टात झाली.

कामाच्या वाटपाचा परिसर मोठा नव्हता, पण काम खूप होते. काही कारखान्यांतून ५०-६० रजिस्टर्ड पत्रे, वीस-पंचवीस मनीऑर्डर्स असे काम असे. कामगारांना बोलवा, इंटिमेशन ठेवा, सह्या घ्या, पोचपावत्या घ्या असे कागदी घोडे सारखे नाचवत काम चालू असायचे. कामगार नसले, शिफ्ट्स वेगळ्या असल्या की हे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकेच वाढे.

आता माझ्या बी.ए.च्या परीक्षेला फार थोडे दिवस उरले होते. मी रजेचा अर्ज टाकला आणि तो मंजूर झाल्याचे समजले. मी अभ्यासात मग्न झालो. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पोस्टात रुजू झालो. या वेळी ज्या परिसरात कॉलेजची चार वर्षे गेली, त्या परिसरात पोस्टमन म्हणून मला काम करावे लागणार होते. आनंद एकाच गोष्टीचा होता, की कॉलेज ज्या भागात होते त्या भागाची बीट मिळाली नाही याचा. त्यामुळे काळजी बरीच कमी झाली.

हा सगळा भाग म्हणजे चकचकीत, शिष्टाचारी, पांढरपेशा समाजाचा. सुस्थापित, सुखासीन असे जग. त्यांची राहणी, त्यांचा थाट यांना काही वेगळीच खुमारी असे. आपण जिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, तिथपर्यंत केवळ पत्र टाकण्याच्या निमित्ताने मी जात होतो. काही बंगल्यांतल्या कुत्र्यांचे आवाज एवढे भयानक असत, की रखरखत्या ठन्हात अंगावर सरसरून काटा येई.

सोसायट्यांची नावेदेखील वैभवशाली; समृद्धीशी नाते सांगणारी. त्यात राहणारे लोकही तितकेच संपन्न. आतापर्यंत बघितलेल्या जगापेक्षा हे सर्वस्वी वेगळे जग होते. इथे माणसे फार कमी भेटायची. माणसांपेक्षा त्यांच्या वास्तु, बंगले, सोसायट्याच अधिक भेटायच्या.

पोस्टमनच्या कामाची सत्त्वपरीक्षा असते ती पावसाळ्यात. कसाही पाऊस असो. पत्रवाटप झालेच पाहिजे! 'अहनिंश सेवामहे' हे ब्रीदवाक्य पोस्टखात्याचे. या ब्रीदवाक्याची सर्वांत जास्त किंमत मोजतो तो पोस्टमनच! रेनकोट घ्या, छत्री घ्या, भिजावे लागणारच! पत्रे कितीही सुरक्षित न्यायचा प्रयत्न केला, तरीही ती थोडीफार भिजतात, पण लोक तक्रारी थांबवत नाहीत.

लाळेगुरुजी नावाचे एक ज्येष्ठ पोस्टमन मित्र म्हणत --''अहो खोरे, पोस्टमनला शंभर मालक! ओव्हरसिअर बोलणार, पोस्टमास्तर बोलणार आणि पब्लिकही बोलणार! आपण सगळ्यांशी गोड बोलून काम चालवायचं!"'

पावसाळा संपताच मी बी.ए.च्या उरलेल्या दोन विषयांची तयारी सुरू केली. ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली. त्यानंतर बी.ए. ऑनर्स मिळाल्याचे सांगणारी मार्कलिस्टही मला मिळाली.

याच काळात सर्वांचा थरकाप उडवून देईल असे तीन खून एकाच वेळी एकाच घरी पुण्यात झाले. तब्बल चार महिन्यांनी पोलिसांनी आरोपींना पकडले. मी त्याच दिवशी रात्री बसून 'भयासुराच्या छायेतील ते भीषण दिवस' हा लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ या दैनिकाकडे पाठवून दिला. पाचव्याच दिवशी तो लेख प्रसिदध झाला आणि मला खूप नाव मिळाले. मी आनंदून गेलो. पोस्टात तर कारकून मंडळी माझ्याच लेखाविषयी चर्चा करत होती. जिथे मी पत्रे टाकत होतो, त्या भागातल्या लोकांची मने गलबलून गेली होती. आज जो तो माझे नाव जिचारत होता. चहा घेण्याचा आग्रह करत होता.

एका पोस्टमनचे एका लेखकात‌ संक्रमण होत होते. त्याचा अनुभव मी घेत होतो. लेख प्रसिद्ध झाल्यापासून मला सारखे वाटायचे, की सकाळमध्येच आपल्याला संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल; पण त्यासाठी वृत्तपत्रविद्येची पदवी आली, त्यासाठी ही नोकरी सोडणे आले. वाटले सोडावी ही पोस्टमनची नोकरी! पण पुढे काय? दोन्ही वेळच्या जेवणाचे वांधे होतील; पण त्या लेखाने मनाला एक बळ दिले होते. आपल्यात काही न संपणारे असल्याची जाणीव करून दिली होती.

शेवटी मी पोस्टमनच्या नोकरीचा राजीनामा दिला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मी थोडा निर्धास्त होतो; कारण एक-दोन ठिकाणांहून कामाची आश्वासने मिळाली होती. त्याच आधारावर वृत्तपत्र विद्याप्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरला. मुलाखत झाली आणि मला प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. मी बाजी जिंकली होती.

पत्रकार होण्याच्या स्वप्नाने मला आजवर न पाहिलेल्या एका वेगळ्याच जगात आणून सोडले होते. आपण जगाच्या नकाशात जणू एका मध्यवर्ती केंद्रावर उभे आहोत याची जाणीव मला त्या वेळी झाली.


 


Saturday 30 May 2020

मनातले चांदणे (मधु मंगेश कर्णिक) - इयत्ता ६वी (२००६)

मधु मंगेश कर्णिक -- कथाकार कादंबरीकार. गाव आणि शहर यांतील जीवनानुभव ते आपल्या कथा- कादंबऱ्यांतून उत्कटतेने मांडतात. “भाकरी आणि फूल', 'तोरण', 'तहान', “माहीमची खाडी', 'अबीर गुलाल', 'माझा गाव', 'माझा मुलुख इत्यादी यांची पुस्तके.

गरीब व्यक्तींना जीवनाला सामोरे जाताना बऱ्याच अडचणींना तोंड दयावे लागते. जिद्द राखून स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे लागते; परंतु त्यातही एक आगळा आनंद असतो. अशा व्यक्ती ज्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळाली त्यांच्याबद्दल मात्र आदर कायम ठेवतात, हे बल्लूच्या गोष्टीवरून पाठात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते. रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा कोण असतो, हे आपल्याला कुठे माहीत असते? आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकते, एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण अगदी योगायोगाने त्या दिवशी वृत्तपत्रांची गाडी उशिरा आल्यामुळे, रोज आमच्या दाराखालून पेपर सरकवणारा बल्लू आम्हांला भेटला. आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्या दिवशी आम्हीही पेपरची वाट पाहत होतो, तेवढ्यात बल्लू दारात डोकावला.
दहा-अकरा वर्षांचे वय, सावळा तजेलदार वर्ण, तरतरीत चेहरा आणि पाणीदार डोळे, चपळ हालचाली! पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली, किंचित घुटमळला आणि म्हणाला, “थोडं पाणी मिळेल प्यायला?”
आम्ही चहा पीत होतो. मी विचारले, चहा पितोस?”
नको, पाणी द्या.”
का कुणास ठाऊक, पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला. त्याने आत यावे, पाणी प्यावेच -- पण आमच्याबरोबर थोडा चहाही घ्यावा, असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले, ते तो घटाघट प्याला. मग त्याने कपाळावरचा, मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला नि म्हणाला,
सकाळीच तहान लागली, कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी.”
 “धावत का जावं? सावकाश जावं.”
पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्य़ा साहेबलोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा, म्हणून धावत आलो. झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता....”
तू शाळेत जातोस?”
 हो, सहावीत आहे.”
कुठल्या शाळेत जातोस?”
म्युनिसिपालिटीच्या.....”
तुझं नाव काय?”
बल्लू.”
छान आहे तुझं नाव, बल्लू....” मी त्याचे नाव दोन-तीन वेळा तोंडात घोळवले.
शाळेतलं नाव बल्लव.”
पण बल्लूच छान वाटतं.”
बल्लू गमतीदार हसला, तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले.
मग बल्लू काखेत पेपरांची चळत घेऊन लगबगीने, जवळजवळं पळतच निघन गेला. जाताना हसत म्हणाला, “जातो, उशीर होईल.”
नंतर बल्लू सकाळचा दिसला नाही. आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा. पण एके दिवशी रविवारी तो अवचित उगवला. दुपारी बाराचा सुमार होता, दूरदर्शनवर पशुपक्ष्यांर आधारित चित्रमालिका
लागलेली होती व घरातील लहानमोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते. तोच बल्लू येऊन तेथे हजर झाला: सगळ्यांबरोबर तोही ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला. चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारले,
            बल्लू, तू केव्हा आलास?
आताच! सगळे प्राणी पाहायला मिळाले. त्यासाठीच मुद्दाम इथं आलो. झालंच तर बिल.... हातातल्या फायलीतून आमचे पेपरचे बिल काढून माझ्या हाती देत तो म्हणाला.
तुला आता बिल गोळा करायंचं काम मिळालं वाटते? मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो. म्हणजे शेटजींनी तुला बढती दिली.
बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न हसला. त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते.
माझं गणित चांगलं आहे, मी हिशेब बिनचूक करतो, म्हणून शेटजींनी हे बिलांचे काम मला दिलं.
किती बिले बनवतोस?
मी पन्नास बनवतो. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिलं बनवत असतात.
तुला पगार किती मिळतो बल्लू?
शंभर रुपये..... तो ऐटीने म्हणाला.
घरी कोणकोण आहेत तुझ्या?
आई, वडील आणि दोन लहान भावंडं, वडील गिरणीत होते, संपात त्यांची नोकरी सुटली.
जणू काही मी पुढचे प्रश् विचारीन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली. आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबांतील एका कुटुंबातला बल्लू होता. शाळेत जाऊन अभ्यास करत होता. शिकता शिकता मेहनत करून दरमहा शंभर रुपयांचा हातभार घरच्या संसाराला लावत होता. बल्लूने विचारले,दर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल?
का रे?”
ही प्राण्यांची मालिका आहे ना, ती मला खूप आवडते. ती पाहण्यासाठी मी येईन. संपली की निघून जाईन.”
तुझ्या घराशेजारी कोणाचा टी.व्ही. नाही?''

आमच्या वस्तीत एकदोघांकडे आहेत,पण ते दारं लावून घेतात. माझी आई कामाला जाते त्या शेटजींकडे तुमच्या टी.व्ही.सारखाच मोठा रंगीत टी.व्ही. आहे. तिथं एकदा मी आईबरोबर गेलो, तर ते आईला रागे भरले. म्हणाले, 'मोलकरणीच्या मुलासाठी आम्ही टी.व्ही. लावत नाही!” बोलता बोलता त्याला गहिवरून आले. तो गप्प राहिला.
ठीक आहे.... तू दर रविवारी येत जा इथं टी.व्ही. पाहायला बल्लू....”
बल्लुचा चेहरा खुलला. तो आनंदाने उड्या मारतच निघून गेला आणि पुढल्या रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला. त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता.
टी.व्ही. बंद केल्यावर बल्लू जायला निघाला. जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारले,तुम्ही लेखक आहात ना?”
बल्लूचा हा प्रश्‍न मला अनपेक्षित होता. मी त्याला उलट विचारले,तुला कोणी सांगितलं?'”
तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर. मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो, तेव्हाच ओळखलं होतं. आम्हाला पाचवीला धडा होता तुमच्या
मोतीचा’….”
मला बल्लुचे अधिकच कोतुक वाटू लागले. मी त्याला माझ्याजवळची गोष्टींची, चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. तो फारच खुश झाला म्हणाला,मला गोष्टी वाचायला खूप आवडतं.”
त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टी.व्ही. पाहायला येऊ लागला. अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येई. हल्ली तो सकाळी पेपरचे वाटप करत नव्हता. त्याची हुशारी पाहून शेटजींनी त्याला, वृत्तपत्रांच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरांचे विभागवार वाटप करून त्या साऱ्याचा हिशेब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते. बल्लुच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीचे होते, पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता. जेव्हा त्याच्या वयाची मुले साखरझोपेत असत तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे.
टी.व्ही.वर प्रदर्शित होणारी पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली, तरी बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला. आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी लिहिलेले एक पुस्तक तो घेऊन आला नि म्हणाला,किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना. तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही?”
मी म्हणालो,प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटतो. तुझाही गाव असेल ना कुठंतरी? कोकणात नसला तरी देशावर, मराठवाड्यात, विदर्भात, कुठंतरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेलच. तू तिथं गेलास तर तोही मुलुख तुला सुंदर वाटेल.”
आम्हांला गावच नाही,” तो उदासपणे म्हणाला.माझे आईवडील खेडं सोडून मुंबईत आले त्याला खूप वर्षं झाली. माझा जन्म तर इथलाच. डोंगर, नदी, कुरणे, झाडं-वेली...झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी -- यांपैकी मी काहीही कधी पाहिलेलंच नाही...'' मग थोडा वेळ थांबून एकदम तो म्हणाला,मला न्याल तुमच्या गावी? तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पहायचं आहे! मुंबईत आम्ही कधी पोौर्णिमेचं चांदणं पाहिलं नाही...”
बल्लू, मी तुला नेईन माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी. तिथं तुला चांदणं पाहता येईल. चांदण्यात मनसोक्त बागडता येईल.”
खरंच?'” विश्वास न बसल्यासारखे त्याने मला विचारले.
मी म्हणालो, “खरंच!”
बल्लूच्या डोळ्यांत मी त्या वेळी पौर्णिमेचे चांदणे जणू पाहत होतो.
त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो. त्या गडबडीत बल्लूला भेटायचे राहूनच गेले. तोही त्या मुदतीत का कुणास ठाऊक फिरकला नाही. बल्लूला दिलेले वचन माझ्याकडून पूर्ण व्हायचा योग नव्हता.
त्यानंतर बरेच दिवस लोटले. बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या. नवी जागा, नवा परिसर, नवी कामे, नवी माणसे यात चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला.
असेच दिवस उलटत होते.... आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला!
विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती. अनेक नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. निर्णय जाहीर झाला. त्या स्पर्धेतील विजेत्या बाल-लेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. मी स्पर्धेचा निर्णय पाहिला. पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते --- “कुमार बल्लब कदम” आणि त्याच्या लेखाचे शीर्षक होते – “मला न भेटलेले अंगणातील चांदणे!”
त्या निबंधावरून मी नजर फिरवली. बल्लवने सुरेख अक्षरांत लिहिले होते--“ माझं एक चिमुकलं स्वप्न आहे -- कोकणात किंवा कुठेही मुंबई-बाहेरच्या खेड्यात आपलं एक “छोटंसं कौलारू घरकूल असावं. त्याला
टुमदार अंगण असावं. त्या अंगणात रात्री चंद्राचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं -- नि मी त्याला कडेवर उचलून घ्यावं! ''
बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला. मघापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. गेल्या तीन-साडेतीन वर्षांनतर बल्लू किती वेगळा दिसत होता! अशक्त, उंच आणि हडकुळा. बल्लूला त्याच्या चमकदार, प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यांमुळेच मी ओळखू शकलो होतो. बल्लुने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले. मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला. त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला, “सर, मला तुमचा पत्ता हवा.”
मी माझ्या पत्त्याचे कार्ड त्याला दिले आणि म्हणालो, “भेटायला ये या पत्त्यावर, आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना?”
पण बल्लू आलाच नाही. त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आले. त्याने आपल्या सुरेख वळणदार अक्षरांत लिहिले होते -- “प्रिय सर, तुम्ही मला वाचनाची गोडी लावलीत. त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली. तुम्ही
चांदणं दाखवायला गावी नेणार होता मला, ते मी विसरलो नव्हतो. त्याचीच गोष्ट लिहिली नि पहिलं बक्षीस मिळालं! खरं तर हे सारं तुमच्यामुळं....



            तुमचे किती आभार मानू? सर, मी दहावीच्या वर्गात आहे. पण मध्ये खूप घडामोडी घडल्या. माझे बाबा. वारले, आई खूप आजारी असतें. मी रात्रशाळेत शिकतो. दिवसा नोकरी करतो. आई, भावंडे यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणं शक्यच नाही.
कधीच शक्य नाही.
“सर, काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं. चांदण त्यांना भेटतच नाही! तसंच माझं झालं असेल का? पण तुम्ही मला मायेनं, आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं, त्यातच चांदण्याचा एक कवडसा मला भेटला. तो पुरेसा आहे.
तुमचा नम्र,
बल्लू उर्फ बल्लव कदम”
मी पत्रावर बल्लूचा पत्ता शोधू लागलो. पण बल्लूने पत्ता लिहिलाच नव्हता!