Copy Pate Block

Monday, 1 June 2020

पाखऱ्या (इयत्ता ७वी - २००७)

 

रंगराव बापू पाटील (जन्म १९३९): ग्रामीण कथा कादंबरी लेखक. ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 'ल्हावर', 'रानकोंबडी', ‘मुराळी', ‘भोवरा' इत्यादी कथासंग्रह; 'बोरबन', 'दंश', 'वस्ताद' या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित.

आपल्या कृषिप्रधान देशात बैलाला विशेष महत्त्व आहे. 'पाखऱ्या ' या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्यांबद्दलची प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे.

_______________________________________________________________________________

                आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती. वशिंड ऐटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एकाच डिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जाई.

आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळवून आणत, मग त्याला भरडा चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार

आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे. ते त्याला जिवापाड जपत.

पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती.

'आबांचा पाखऱ्या' या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा-वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते येई.

एकदा गुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱर्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर-कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला. कऱ्हाडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती. झुंज सुरू

झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या. खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागली. धुरळा उडाला. झुंज चांगली तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखर्याने एक जोराची धडक दिली आणि गुढे गावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखर्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली. त्याच वेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कुणी फेटे उडवले. कुणी गुलाल उडवला.

आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंत:करण आनंदाने फुलून आले.

मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी-लेझीम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले

आतां पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांची अशी लढत लावणे ती पाहत बसणे हे अमानुष आहे, असे सरकारने म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत गाडीलाही जुंपत नसत. नांगराला तर त्याला कधीच जुंपलला नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता

एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडीही तिथेच बसले होते. आबा येताच त्यांचे बोलणे थांबले. आबांनी विचारले,

‘’कायरं? असं का गप झालाय? काय बेत हाय?"

"काय न्हाय,'' एक गडी हळूच बोलला.

‘’काय जयसिंगराव, काय चाललंय?"'

जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले, “पाखऱ्याला इकायचं म्हणतुया."

"डोकं फिरलं काय तुझं '’ आबा संतापून म्हणाले.

सर्वजण गप्प झाले; पण तोच आबांनी पुन्हा विचारले,

का? कशासाठी विकायचा?”

त्यो झुंज खेळणारा बैल हाय. रानातल्या कामाला उपयोगी पडत न्हाय. आता त्यो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतुया. इकून पैकाबी चांगला यील..." जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले.

तुमाला काय करायचं ते करा जावा. तुमी कारभारी हाय आता,'' असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले.

त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोष होऊन नाचणारी, रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते.

जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुऊन आणला. शिंगे घोळून टोकदार केली. गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला. एका पायात काळा गोफ बांधला. अंगावर सुंदर नक्षीची झूलही घातली.

सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते. मगगड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीणबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला.

'“हंजा बाबा, तुझा इथला घास संपला आता,'' आबा आवंढा गिळत बोलले.

काय आबा? कुणाचा घास संपला आता?'” असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही, तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाहीत.

'“काय गडबड आहे जयसिंगराव?" तात्यांनी विचारले.

''विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला."

विकायला?”

होय तात्या.''

कारं बाबा?'

"आता तो म्हातारा झालाय. शेतीची कामही त्याला जमत न्हाईत."

म्हणून विकता?” तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले.

होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला स्वरानाही लई लागतुया. तोही खर्च इनाकारणी.

यावर तात्या गप्प झाले सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कृणीच काही बोलले नाही.

मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले, “जयसिंगराव,जरा इकडंया.''

जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला.

बसा, खाली बसा.''

काय तात्या?"

असं खाली बसा. मग सांगतो."

जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पायऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीणबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या.

जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती?"

का बरं?'"

किंमत बोला अगोदर,'' तात्या गंभीरपणे म्हणाले.

पाच हजार रुपये...”

  “पाखऱ्याला मी घेतोय...”

तुमी?”

होय. आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा. ते आमच्याकडेच राहतील.”

 का बरं?”

ते पण आता म्हातारे झालेत. त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो. तो विनाकारण खर्च."

हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले, आरं, पाखऱ्याला दावणीला बांधा. तो आपल्या दावणीला कायम ऱ्हाईल.


जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले. आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.