Tuesday 29 November 2016

दमडी

कुसुमावती देशपांडे - लघुकथा, ललित लेख व साहित्यसमीक्षा या क्षेत्रांत मोलाची कामगिरी. 'दीपकळी', 'दीपमाळ', 'दीपदान' व 'मोळी' हे त्यांचे कथासंग्रह, 'पासंग' हा लेखसंग्रह व 'मराठी कादंबरीचे पहिले शतक' हि त्यांची गाजलेली पुस्तके.
'दमडी' हि कथा 'मोळी' या कथासंग्रहातून घेतलेली आहे. उपेक्षितांच्या जीवनाचे दर्शन या कथेत कुशलतेने घडवलेले आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या एका मुलीच्या स्वप्नाचे चित्रण मनाला चटका लावून जाते.
_________________________________________________________________________________

अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती; कमरेला अर्धे-मुर्धे , विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले दहा-बारा वर्षांचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पहिले तर वाटावे, की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी. पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती.
आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगावजवळच्या वावरात त्या वेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले दोन-अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊ त्या दोघी निघाल्या होत्या. दोन-अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले, अन अखेर बाजार...
तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुऊन भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या  भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती.


अर्रर्रर्र... केवढ्या भर्रर्रर्रदिशी  धावतात या मोटारी ! अन फसदीशी पाणी उडवतात मेल्या... या भाजीवाल्या चालल्या. सोनेगावच्याच तर दिसतात या... हो तर कायती नाही का गोप्याची माय... भल्ली भरली टोपली भेंड्यांनी ! हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान... जसे काय शिपाईच... त्या उडानखटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भारी... अवघा रस्ता भरून टाकतात; बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू... लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या... रामा रामा... केवढा कलकलाट त्यांचा ! अडत्याशी झुंज घालतात जणू ! अहाकाय न्यारा घमघमाट सुटलाय...
तिने मागे वळून पहिले. तिच्या पाठीशीच शेव-भजीवाल्याची राहुटी होतीशेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने ! दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने दोन पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते !


भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हाततोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेऊन झोपली. पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली.
त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत, डोक्यावर जड, लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते.
तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा ! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक... गरम. त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. अहाहा ! शेव ! खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला. पण लगेच भान आले, की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना? त्या मुंडासेवाल्या बाबाला....... त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला.


दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्याचे झोत येत-जात होते. मध्येच ऊन पडे, तर घटकेत वाटे, आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता, ती पुन्हा चालत होती.
आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायांत गोळे आलेले... सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना? आजी तर फाटकातून आत  चालली. चला चला. बंगल्यावर चंदी आहे वाटते ! दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती, तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीलादेखील जाणवत होती. अरेच्या, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाददुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला, ' माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध !' पाहूया तरी ! पण आजी तर फाटकातून बाहेर पडली, म्हणून दमडीही  निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून..... गवतातून.....
आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव ! मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शितळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे...... तो पाहा तो विठू, नारळ फोडतोय वाटतं तो तिथं... 'मला दे की रे थोडं.' 'हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो.' खोबऱ्याचा तुकडा, पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, 'हो हो. हा सगळाच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे, दमडे. घे, सगळा घे, दमडे !'
पण त्याच वेळी 'दमडे... दमडे...' तिच्या आजीच्या हाका आल्याभारे विकून, मीठ-मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती. दमडी जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या-पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, ' दमडे, अशी काहून पाहतं ? ऊठ नं आता?' दमडी उठलीआपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली.
दीडदमडीचा चालत जीव तो... असाच पुढल्या बाजारी चालत येईल त्याच्या पुढल्या बाजारी.... आणि त्याच्या पुढल्याही.

44 comments:

  1. Replies
    1. Thanks.. lavkarch ajun post karnar ahe ata time miltoy tar..

      Delete
    2. Thankyou so much sir
      Jab padhai krne ki Umar thi tb is chapter ka meaning nhi samaj paye aaj jab aapki post read ki to yar ankho me aansu agye .. .. kuch same halat mere bhi the ... Us samay anyway again thanks a lot aise hi post krte rahiye ....

      Delete
  2. आम्हाला दमडी हा धडा हेता.मला खुप आवडायचा खुप वर्षानी वाचायला मिळाला.धन्यवाद प्रतिक

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks.. मनातले चांदणे पोस्ट करणार आहे आता

      Delete
    2. ho nakki kr amhala hota manatle chandnae....amhi tumche abhari khup khup

      Delete
    3. Aahe ka kunakde manatale chandane asel tr plz send kara

      Delete
  3. नवीन काहीतरी वाचायला भेटल

    ReplyDelete
  4. खूप वर्षांनी परत एकदा वाचण्याचा मोह झाला.
    खूप छान

    ReplyDelete
  5. Khup mast parat lahanach jhalo

    ReplyDelete
  6. Thanks for sharing 👍🙏

    ReplyDelete
  7. Far divsani varil gost vachli khup aanad vatla.

    ReplyDelete
  8. मला माझी शाळा आठवली. आणि ते ८वी च वर्ग ही...

    ReplyDelete
  9. असं वाटत होतं की दर वर्षी हा धडा असायला हवा होता पुढल्या वर्षी आणखी पुढल्या वर्षी आणखी पुढल्या वर्षी..😔😔

    ReplyDelete
  10. मला ते शाळेचे दिवस आठवले पार रडायला आल

    ReplyDelete
    Replies
    1. मला ते शाळेचे दिवस आठवले आज पुस्तक वाचून

      Delete
  11. पुन्हा ई.८ वी चे ते सोनिरी दिवस आठवले .अतिशय सुंदर असे शालेय जीवन होते.

    ReplyDelete
  12. Really mast yaar.... khup miss kartoy...
    Parat atavala te sarva frinds sir and amcha classroom. ...
    Ganesh s.kamble

    ReplyDelete
  13. Thank you Amar... school madhil athvani samor Alya....

    ReplyDelete
  14. मला खूप आनंद झाला आहे की मी परत एकदा धडा वाचून माझं बालपण आठवून गेले

    ReplyDelete
  15. Very nice bro shalet astana vachli hoti ata parat vachayla bhetli

    ReplyDelete
  16. I was too small when read that story it's like a part of you collect it it was very nice and thank you. you wrote that in readable digital format

    ReplyDelete
  17. tevhachi paristiti tadhich hoti ...ha path vachtana damdichya jagi swatahala pahaycho mi .aaj sagla ahe pan tya dudh bhakrichi ani bajaratlya shev chi chav ajun jibhevar gholte.......thanks for memories

    ReplyDelete
  18. Atyanta subak prakare satya paristhitiche chitra kusumavati yani rekhatle . Shalet ha dhada vachtana Ani tyatil chitra pahtana sagla damdi disayla kashi asel , to bazar kasa asel he apanhun dolyasamor yaych. Pn sharat shaharat rahilya mule damdi sarkha anubhavla nhi . Karan sagla khau milaycha . Pn aata gavo gavi firun tithlya lokana Ani damdi sarkhya lahan mulan baghun patkan anubhavta yet. Aaj konas thauk pn damdichi dhadyachi aathvan ali Ani vachla. Var sagliani mhatlya pramane shaletil diwas aathvle . Lekhika kusumavati yani kathetil patra Uttam ritya sakarli ahet . Ani aaj suddha ashya anek damdi Aplya ajun bajula ahet . Dhanyawad.

    ReplyDelete
  19. मस्त धडा होता प्रत्यक्षात आपणच त्या जागी असण्याचा अनुभव होतो ☺

    ReplyDelete
  20. खूप छान होता धडा

    ReplyDelete
  21. खूप छान होता धडा . बालपाणिनींचे शाळेतील दिवस आठवले.मराठी आणि भूगोल हा माझा फेव्हरेट विषय होता.

    ReplyDelete
  22. खुपच भारी वाटल हा धडा पुन्हा वाचून बालपण आठवल

    ReplyDelete
  23. खूप छान वाटलं .. बालपणाची आठवण झाली..

    ReplyDelete
  24. खरंच लहानपणी चे दिवस आठवले👍👍👍👍

    ReplyDelete
  25. https://youtu.be/_4FqfPC5KaU

    ReplyDelete
  26. पुन्हा पुन्हा वाचण्यासचा मोह आवरत नाही.

    ReplyDelete
  27. Ha ekch dhada ahe ka
    Yach purn novel ahe ka

    ReplyDelete
  28. Mala novel ch nav kalel ka

    ReplyDelete
  29. खूप छान शाळेचे दिवस आठवले असेच जुने पाठ घेऊन या देव तुम्हाला सुखात ठेवो...

    ReplyDelete