Saturday 30 May 2020

मनातले चांदणे (मधु मंगेश कर्णिक) - इयत्ता ६वी (२००६)

मधु मंगेश कर्णिक -- कथाकार कादंबरीकार. गाव आणि शहर यांतील जीवनानुभव ते आपल्या कथा- कादंबऱ्यांतून उत्कटतेने मांडतात. “भाकरी आणि फूल', 'तोरण', 'तहान', “माहीमची खाडी', 'अबीर गुलाल', 'माझा गाव', 'माझा मुलुख इत्यादी यांची पुस्तके.

गरीब व्यक्तींना जीवनाला सामोरे जाताना बऱ्याच अडचणींना तोंड दयावे लागते. जिद्द राखून स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे लागते; परंतु त्यातही एक आगळा आनंद असतो. अशा व्यक्ती ज्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळाली त्यांच्याबद्दल मात्र आदर कायम ठेवतात, हे बल्लूच्या गोष्टीवरून पाठात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते. रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा कोण असतो, हे आपल्याला कुठे माहीत असते? आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकते, एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण अगदी योगायोगाने त्या दिवशी वृत्तपत्रांची गाडी उशिरा आल्यामुळे, रोज आमच्या दाराखालून पेपर सरकवणारा बल्लू आम्हांला भेटला. आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्या दिवशी आम्हीही पेपरची वाट पाहत होतो, तेवढ्यात बल्लू दारात डोकावला.
दहा-अकरा वर्षांचे वय, सावळा तजेलदार वर्ण, तरतरीत चेहरा आणि पाणीदार डोळे, चपळ हालचाली! पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली, किंचित घुटमळला आणि म्हणाला, “थोडं पाणी मिळेल प्यायला?”
आम्ही चहा पीत होतो. मी विचारले, चहा पितोस?”
नको, पाणी द्या.”
का कुणास ठाऊक, पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला. त्याने आत यावे, पाणी प्यावेच -- पण आमच्याबरोबर थोडा चहाही घ्यावा, असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले, ते तो घटाघट प्याला. मग त्याने कपाळावरचा, मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला नि म्हणाला,
सकाळीच तहान लागली, कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी.”
 “धावत का जावं? सावकाश जावं.”
पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्य़ा साहेबलोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा, म्हणून धावत आलो. झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता....”
तू शाळेत जातोस?”
 हो, सहावीत आहे.”
कुठल्या शाळेत जातोस?”
म्युनिसिपालिटीच्या.....”
तुझं नाव काय?”
बल्लू.”
छान आहे तुझं नाव, बल्लू....” मी त्याचे नाव दोन-तीन वेळा तोंडात घोळवले.
शाळेतलं नाव बल्लव.”
पण बल्लूच छान वाटतं.”
बल्लू गमतीदार हसला, तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले.
मग बल्लू काखेत पेपरांची चळत घेऊन लगबगीने, जवळजवळं पळतच निघन गेला. जाताना हसत म्हणाला, “जातो, उशीर होईल.”
नंतर बल्लू सकाळचा दिसला नाही. आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा. पण एके दिवशी रविवारी तो अवचित उगवला. दुपारी बाराचा सुमार होता, दूरदर्शनवर पशुपक्ष्यांर आधारित चित्रमालिका
लागलेली होती व घरातील लहानमोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते. तोच बल्लू येऊन तेथे हजर झाला: सगळ्यांबरोबर तोही ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला. चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारले,
            बल्लू, तू केव्हा आलास?
आताच! सगळे प्राणी पाहायला मिळाले. त्यासाठीच मुद्दाम इथं आलो. झालंच तर बिल.... हातातल्या फायलीतून आमचे पेपरचे बिल काढून माझ्या हाती देत तो म्हणाला.
तुला आता बिल गोळा करायंचं काम मिळालं वाटते? मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो. म्हणजे शेटजींनी तुला बढती दिली.
बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न हसला. त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते.
माझं गणित चांगलं आहे, मी हिशेब बिनचूक करतो, म्हणून शेटजींनी हे बिलांचे काम मला दिलं.
किती बिले बनवतोस?
मी पन्नास बनवतो. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिलं बनवत असतात.
तुला पगार किती मिळतो बल्लू?
शंभर रुपये..... तो ऐटीने म्हणाला.
घरी कोणकोण आहेत तुझ्या?
आई, वडील आणि दोन लहान भावंडं, वडील गिरणीत होते, संपात त्यांची नोकरी सुटली.
जणू काही मी पुढचे प्रश् विचारीन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली. आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबांतील एका कुटुंबातला बल्लू होता. शाळेत जाऊन अभ्यास करत होता. शिकता शिकता मेहनत करून दरमहा शंभर रुपयांचा हातभार घरच्या संसाराला लावत होता. बल्लूने विचारले,दर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल?
का रे?”
ही प्राण्यांची मालिका आहे ना, ती मला खूप आवडते. ती पाहण्यासाठी मी येईन. संपली की निघून जाईन.”
तुझ्या घराशेजारी कोणाचा टी.व्ही. नाही?''

आमच्या वस्तीत एकदोघांकडे आहेत,पण ते दारं लावून घेतात. माझी आई कामाला जाते त्या शेटजींकडे तुमच्या टी.व्ही.सारखाच मोठा रंगीत टी.व्ही. आहे. तिथं एकदा मी आईबरोबर गेलो, तर ते आईला रागे भरले. म्हणाले, 'मोलकरणीच्या मुलासाठी आम्ही टी.व्ही. लावत नाही!” बोलता बोलता त्याला गहिवरून आले. तो गप्प राहिला.
ठीक आहे.... तू दर रविवारी येत जा इथं टी.व्ही. पाहायला बल्लू....”
बल्लुचा चेहरा खुलला. तो आनंदाने उड्या मारतच निघून गेला आणि पुढल्या रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला. त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता.
टी.व्ही. बंद केल्यावर बल्लू जायला निघाला. जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारले,तुम्ही लेखक आहात ना?”
बल्लूचा हा प्रश्‍न मला अनपेक्षित होता. मी त्याला उलट विचारले,तुला कोणी सांगितलं?'”
तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर. मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो, तेव्हाच ओळखलं होतं. आम्हाला पाचवीला धडा होता तुमच्या
मोतीचा’….”
मला बल्लुचे अधिकच कोतुक वाटू लागले. मी त्याला माझ्याजवळची गोष्टींची, चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. तो फारच खुश झाला म्हणाला,मला गोष्टी वाचायला खूप आवडतं.”
त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टी.व्ही. पाहायला येऊ लागला. अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येई. हल्ली तो सकाळी पेपरचे वाटप करत नव्हता. त्याची हुशारी पाहून शेटजींनी त्याला, वृत्तपत्रांच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरांचे विभागवार वाटप करून त्या साऱ्याचा हिशेब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते. बल्लुच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीचे होते, पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता. जेव्हा त्याच्या वयाची मुले साखरझोपेत असत तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे.
टी.व्ही.वर प्रदर्शित होणारी पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली, तरी बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला. आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी लिहिलेले एक पुस्तक तो घेऊन आला नि म्हणाला,किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना. तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही?”
मी म्हणालो,प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटतो. तुझाही गाव असेल ना कुठंतरी? कोकणात नसला तरी देशावर, मराठवाड्यात, विदर्भात, कुठंतरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेलच. तू तिथं गेलास तर तोही मुलुख तुला सुंदर वाटेल.”
आम्हांला गावच नाही,” तो उदासपणे म्हणाला.माझे आईवडील खेडं सोडून मुंबईत आले त्याला खूप वर्षं झाली. माझा जन्म तर इथलाच. डोंगर, नदी, कुरणे, झाडं-वेली...झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी -- यांपैकी मी काहीही कधी पाहिलेलंच नाही...'' मग थोडा वेळ थांबून एकदम तो म्हणाला,मला न्याल तुमच्या गावी? तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पहायचं आहे! मुंबईत आम्ही कधी पोौर्णिमेचं चांदणं पाहिलं नाही...”
बल्लू, मी तुला नेईन माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी. तिथं तुला चांदणं पाहता येईल. चांदण्यात मनसोक्त बागडता येईल.”
खरंच?'” विश्वास न बसल्यासारखे त्याने मला विचारले.
मी म्हणालो, “खरंच!”
बल्लूच्या डोळ्यांत मी त्या वेळी पौर्णिमेचे चांदणे जणू पाहत होतो.
त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो. त्या गडबडीत बल्लूला भेटायचे राहूनच गेले. तोही त्या मुदतीत का कुणास ठाऊक फिरकला नाही. बल्लूला दिलेले वचन माझ्याकडून पूर्ण व्हायचा योग नव्हता.
त्यानंतर बरेच दिवस लोटले. बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या. नवी जागा, नवा परिसर, नवी कामे, नवी माणसे यात चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला.
असेच दिवस उलटत होते.... आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला!
विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती. अनेक नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. निर्णय जाहीर झाला. त्या स्पर्धेतील विजेत्या बाल-लेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. मी स्पर्धेचा निर्णय पाहिला. पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते --- “कुमार बल्लब कदम” आणि त्याच्या लेखाचे शीर्षक होते – “मला न भेटलेले अंगणातील चांदणे!”
त्या निबंधावरून मी नजर फिरवली. बल्लवने सुरेख अक्षरांत लिहिले होते--“ माझं एक चिमुकलं स्वप्न आहे -- कोकणात किंवा कुठेही मुंबई-बाहेरच्या खेड्यात आपलं एक “छोटंसं कौलारू घरकूल असावं. त्याला
टुमदार अंगण असावं. त्या अंगणात रात्री चंद्राचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं -- नि मी त्याला कडेवर उचलून घ्यावं! ''
बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला. मघापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. गेल्या तीन-साडेतीन वर्षांनतर बल्लू किती वेगळा दिसत होता! अशक्त, उंच आणि हडकुळा. बल्लूला त्याच्या चमकदार, प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यांमुळेच मी ओळखू शकलो होतो. बल्लुने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले. मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला. त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला, “सर, मला तुमचा पत्ता हवा.”
मी माझ्या पत्त्याचे कार्ड त्याला दिले आणि म्हणालो, “भेटायला ये या पत्त्यावर, आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना?”
पण बल्लू आलाच नाही. त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आले. त्याने आपल्या सुरेख वळणदार अक्षरांत लिहिले होते -- “प्रिय सर, तुम्ही मला वाचनाची गोडी लावलीत. त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली. तुम्ही
चांदणं दाखवायला गावी नेणार होता मला, ते मी विसरलो नव्हतो. त्याचीच गोष्ट लिहिली नि पहिलं बक्षीस मिळालं! खरं तर हे सारं तुमच्यामुळं....



            तुमचे किती आभार मानू? सर, मी दहावीच्या वर्गात आहे. पण मध्ये खूप घडामोडी घडल्या. माझे बाबा. वारले, आई खूप आजारी असतें. मी रात्रशाळेत शिकतो. दिवसा नोकरी करतो. आई, भावंडे यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणं शक्यच नाही.
कधीच शक्य नाही.
“सर, काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं. चांदण त्यांना भेटतच नाही! तसंच माझं झालं असेल का? पण तुम्ही मला मायेनं, आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं, त्यातच चांदण्याचा एक कवडसा मला भेटला. तो पुरेसा आहे.
तुमचा नम्र,
बल्लू उर्फ बल्लव कदम”
मी पत्रावर बल्लूचा पत्ता शोधू लागलो. पण बल्लूने पत्ता लिहिलाच नव्हता!

7 comments:

  1. गोष्ट खूप छान आहे.असे खुप बल्लू आहेत की त्यांना त्याचे स्वप्न पूर्ण करायला मिळत नाही.ही गोष्टी मध्ये बल्लू चे जीवन वाचून खुप वाईट वाटत.या गोष्टी post करुन तुम्ही शाळे चे दिवसां ची आठवण करुन दिली.

    ReplyDelete
  2. खूप दिवसांनी हे लेख वाचायला मिळाले खूप खूप आभारी आहोत

    ReplyDelete
  3. hya lekhachi khup vat pahili...mla hota sahavila ha path...aathvni tajya jhalya

    ReplyDelete
  4. सहावीत असताना हा धडा मी खुप वेळा वाचन करायचो हा धडा माझा तोंडपाठ झाला होता धन्यवाद सर तुमच्यामुळे पुनः शाळेच्या त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    ReplyDelete
  5. शाळेत असताना खूप आवडता धडा होता हा माझा. खूप वर्ष झाली शोधात होतो. बरे वाटले वाचून. धन्यवाद.

    ReplyDelete
  6. Khupach chhan dhada hota ha, maza aani mazya eka mitracha Mahavir cha aavadta dhada hota ha...thank you..

    ReplyDelete