Saturday, 27 October 2018

अशी असावी मैत्री

एका अरण्यात एक छोटासा हरिण होता . मध्येच तो आपला कळप सोडून एकटाच रानावनात भटकायचा.
असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले. शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही. त्याने त्याला राजवाड्यात नेले. राजपुत्राला तो हरिण फार आवडला. त्याने शिकाऱ्यास बक्षीस दिले आणि हरिण ठेऊन घेतला.
                राजपुत्र त्या हरणाचे खूप लाड करायचा. त्याला अंघोळ घालायचा, खायला चांगले कोवळे कोवळे, हिरवे गवत द्यायचा. त्या हरणाला मात्र तेथे काही करमेना. तो नेहमी दुःखी असायचा; म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यात सोडून दिले.
                हळू हळू त्या हरणाची उंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली. एक दिवस एक कासवही त्यांना येऊन मिळाला. तेव्हा उंदीर कासवाला म्हणाला, "अरे, तू तलाव सोडून इथं कशाला बरं आलास? एखादा शिकारी आला तर, आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही. हा हरिण बघता बघता पळून जाईल, कावळा उडून जाईल आणि मी एखाद्या  बिळात शिरेन. तुला मात्रं यातलं काहीच जमणार नाही. मग तुझं कसं होणार ? तू आपला परत जा कसा."
      तेव्हा कासव म्हणाला, " अरे, असं म्हणू नकोस. मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे. संकटकाळी उपयोग व्हावा, म्हणून शहाण्यांनी जीवाला जीव देणारे असे मित्र जोडावेत. ज्याने मित्र जोडला नाही, त्याला संकटातून वाचण्याची अशा नसते."

      असे त्यांचे बोलणे चालू होते, इतक्यात हातात धनुष्यबाण घेतलेला शिकारी तेथे आला. त्याला पाहताच उंदीर बिळात सरकला. कावळा उडून झाडाच्या शेंड्यावर बसला. हरीण सुसाट पळत सुटले. बिचारा कासव मात्र जमिनीवरूनच हळूहळू चालू लागला. तेवढ्यात शिकाऱ्याने कासवाला पकडले, पिशवीत टाकले. पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला.
      शिकारी कासवाला पकडून नेत आहे, हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले, तो रडू लागला. इतक्यात हरिण आणि कावळा तेथे आले. त्यांनाही अतिशय दुःख झाले; पण हि वेळ दुःख करत बसण्याची नाही, हे त्यांनी ओळखले. आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत, त्याला काहीही करून सोडवले पाहिजे, असे त्यांनी ठरवले.
      कावळा म्हणाला, "आता मी सांगतो तसं करूया. तो शिकारी ज्या मार्गानं गेला त्या मार्गानंच हरणानं जावं आणि एखाद्या तळ्याच्या काठी अगदी निपचित पडून राहावं. मी त्याच्या डोक्यावर बसून चोचीने खरवडल्यासारखं करीन. शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे. तो कासवाला ठेऊन हरणाजवळ जाईल. त्याच क्षणी हरणाने ताडकन उठून पळून जावं. शिकारी त्याचा पाठलाग करू लागेल. तेवढ्यात उंदरानं पिशवीचे बंध तोडून टाकावे. कासवनं पिशवीतून बाहेर पडावं आणि तळ्यात शिरावं."
      कावळ्याने सांगितलेली हि युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले.

      तळ्याच्या काठावर हरिण निपचित पडलेला असून कावळा त्याला चोचीने टोचत आहे हे शिकाऱ्याने पहिले. खूप दमल्याने हा हरिण मरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले. शिकाऱ्याला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवले व हरणाकडे धाव घेतली. तेवढ्यात उंदराने पिशवीचे बंध कुरतडून तोडून टाकले. कासव पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तळ्यात शिरला. तेवढ्यात तो हरिणही ताडकन उठला व वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला. कावळा उडून गेला. हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला. मागे वळून बघतो  तो कासवही पसार. आपली चूक शिकाऱ्याच्या लक्षात आली. पच्चाताप करत  तो निघून गेला.
     शिकारी निघून गेल्यावर उंदीर, कावळा, हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. कासव म्हणाले, "संकटातून सुटलो बुवा एकदाचे. मैत्रीमुळेच बचावलो." आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले.

No comments:

Post a Comment