Copy Pate Block

Tuesday 6 December 2016

मुक्ताई [बहिणाबाई चौधरी]

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू

“अरे संन्याश्याची पोरं”
कुनी बोलती हिनई
टाकीदेयेलं पोराचं
तोंड कधी पाहू नई

“अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?”
ताटीलायी ग्यानदेव
घरामदी रे दडले

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन

कवियित्री – बहिणाबाई चौधरी

झुळूक मी व्हावे

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

--- दामोदर अच्युत कारे

सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर ||

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी ||

हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे ||

सोनेरी मखमली रुपेरी पंख कितीकांचे
रंग कितींवर तर्‍हेतर्‍हेचे इंद्रधनुष्याचे ||

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती ||

झुळकन सुळकन इकडुन तिकडे किती दुसरी उडती
हिरे, माणके, पांचू फुटूनी पंखची गरगरती ||

पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा ||
--- भा. रा. तांबे

हळूच या हो हळूच या [कुसुमाग्रज]

हळूच या हो हळूच या !!
गोड सकाळी उन पडे, 
दवबिंदूचे पडती सडे
हिरव्या पानांतून वरती, 
येवोनी फुललो जगती
हृदये अमुची इवलीशी, 
परि गंधाच्या मधि राशी
हसुनी डोलून देतो उधळून, 
सुदंध या तो सेवाया
हळूच या पण हळूच या !! १!!
कधि पंनांच्या आड दडू, 
कधि आणू लटकेच रडू
कधि वाऱ्याच्या झोताने, 
दिलात बसतो गमतीने
तऱ्हेतऱ्हेचे रंग किती, 
अमुच्या या अंगावरती 
निर्मल सुंदर अमुचे अंतर, 
या आम्हांला भेटाया
हळूच या पण हळूच या !! २!! 


कवी: कुसुमाग्रज

Monday 5 December 2016

माझ्या गोव्याच्या भूमीत [बा. भ. बोरकर]

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा



माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्‍त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

---- बा. भ. बोरकर

Sunday 4 December 2016

छोटेसे बहिण-भाऊ


छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll 

ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा
शेतांना मळ्यांना, फुलांना फळांना,
नवीन बहार देऊ ll १ ll

मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंद भराने,
आनंद देऊ अन घेऊ ll २ ll

प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकत्र होऊ ll ३ ll


— वसंत बापट

झाडे लावू

एक झाड लावू मित्रा
त्याला पाणी घालू
मोठे झाल्यावर त्याच्या
सावलीत खेळू

एक झाड लावू मित्रा
त्याला कुंपण करू
मोठे झाल्यावर फुले
ओंजळीत भरू

एक झाड लावू मित्रा
त्याची निगा राखू
मोठे झाल्यावर त्याची
गोड फळे खाऊ

एक झाड लावू मित्रा
त्याला रोज पाहू
त्याची गाणी गाता गाता
मोठे मोठे होऊ

-अनंत भावे

या बाळांनो, या रे या !

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !


मजा करा रे ! मजा करा !
आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे,
जिकडेतिकडे फुलें फळें
सुवास पसरे, रसहि गळे.

पर ज्यांचे
सोन्याचे
ते रावे
हेरावे
तर मग कामें टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पाखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती
हरिण किती !
देखावे
देखावे.
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !

चांदोमामा चांदोमामा

बडबड गीत
चांदोमामा चांदोमामा
भागलास का?
लिंबोनीच्या झाडामागे
लपलास का?



लिंबोनीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तुपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोमामा राहिला उपाशी

करंगळी मरंगळी [बडबडगीत]

करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी
तळहात- मळहात
मनगट- कोपर
खांदा-गळागुटी-हनुवटी
भाताचं बोळकं
वसचं नळकं
काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट
देवाजीच्या पाटावर
चिमण्यांचा किलबिलाट

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा, 
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, 
पाऊस आला मोठा
पाऊस पडला झिम् झिम् 
अंगण झालं ओलंचिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवंगार




बाप [इंद्रजित भालेराव]

शेतामधीं माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या 
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट 
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप?



माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला 
रात दिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती 
दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची 
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !

-इंद्रजित भालेराव

Tuesday 29 November 2016

दमडी

कुसुमावती देशपांडे - लघुकथा, ललित लेख व साहित्यसमीक्षा या क्षेत्रांत मोलाची कामगिरी. 'दीपकळी', 'दीपमाळ', 'दीपदान' व 'मोळी' हे त्यांचे कथासंग्रह, 'पासंग' हा लेखसंग्रह व 'मराठी कादंबरीचे पहिले शतक' हि त्यांची गाजलेली पुस्तके.
'दमडी' हि कथा 'मोळी' या कथासंग्रहातून घेतलेली आहे. उपेक्षितांच्या जीवनाचे दर्शन या कथेत कुशलतेने घडवलेले आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या एका मुलीच्या स्वप्नाचे चित्रण मनाला चटका लावून जाते.
_________________________________________________________________________________

अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती; कमरेला अर्धे-मुर्धे , विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले दहा-बारा वर्षांचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पहिले तर वाटावे, की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी. पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती.
आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगावजवळच्या वावरात त्या वेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले दोन-अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊ त्या दोघी निघाल्या होत्या. दोन-अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले, अन अखेर बाजार...
तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुऊन भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या  भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती.


अर्रर्रर्र... केवढ्या भर्रर्रर्रदिशी  धावतात या मोटारी ! अन फसदीशी पाणी उडवतात मेल्या... या भाजीवाल्या चालल्या. सोनेगावच्याच तर दिसतात या... हो तर कायती नाही का गोप्याची माय... भल्ली भरली टोपली भेंड्यांनी ! हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान... जसे काय शिपाईच... त्या उडानखटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भारी... अवघा रस्ता भरून टाकतात; बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू... लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या... रामा रामा... केवढा कलकलाट त्यांचा ! अडत्याशी झुंज घालतात जणू ! अहाकाय न्यारा घमघमाट सुटलाय...
तिने मागे वळून पहिले. तिच्या पाठीशीच शेव-भजीवाल्याची राहुटी होतीशेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने ! दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने दोन पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते !


भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हाततोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेऊन झोपली. पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली.
त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत, डोक्यावर जड, लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते.
तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा ! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक... गरम. त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. अहाहा ! शेव ! खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला. पण लगेच भान आले, की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना? त्या मुंडासेवाल्या बाबाला....... त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला.


दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्याचे झोत येत-जात होते. मध्येच ऊन पडे, तर घटकेत वाटे, आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता, ती पुन्हा चालत होती.
आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायांत गोळे आलेले... सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना? आजी तर फाटकातून आत  चालली. चला चला. बंगल्यावर चंदी आहे वाटते ! दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती, तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीलादेखील जाणवत होती. अरेच्या, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाददुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला, ' माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध !' पाहूया तरी ! पण आजी तर फाटकातून बाहेर पडली, म्हणून दमडीही  निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून..... गवतातून.....
आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव ! मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शितळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे...... तो पाहा तो विठू, नारळ फोडतोय वाटतं तो तिथं... 'मला दे की रे थोडं.' 'हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो.' खोबऱ्याचा तुकडा, पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, 'हो हो. हा सगळाच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे, दमडे. घे, सगळा घे, दमडे !'
पण त्याच वेळी 'दमडे... दमडे...' तिच्या आजीच्या हाका आल्याभारे विकून, मीठ-मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती. दमडी जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या-पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, ' दमडे, अशी काहून पाहतं ? ऊठ नं आता?' दमडी उठलीआपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली.
दीडदमडीचा चालत जीव तो... असाच पुढल्या बाजारी चालत येईल त्याच्या पुढल्या बाजारी.... आणि त्याच्या पुढल्याही.